Babasaheb ambedkar biography in marathi poem
प्रज्ञासूर्याला अभिवादन
Maharashtra Times | Updated: 3 Dec 2017, 4:00 am
Subscribe
१२५ नव्या-जुन्या कवींच्या बाबासाहेबांवरील कवितांचा या ग्रंथात समावेश आहे. ग्रंथाचं शीर्षक खूपच औचित्यपूर्ण आहे. कारण बाबासाहेब हे अफाट कर्तृत्वाने भरलेलं नाव, सबंध जग व्यापूनही उरलेलं आहे.
प्रज्ञासूर्याला अभिवादन
‘दि इन्फिनिट बाबासाहेब’ हा आत्माराम गोडबोले आणि वैभव सोनारकर या संपादक द्वयांनी खूप मेहनत घेऊन सिद्ध केलेला काव्यग्रंथ आहे. एकूण १२५ नव्या-जुन्या कवींच्या बाबासाहेबांवरील कवितांचा या ग्रंथात समावेश आहे. ग्रंथाचं शीर्षक खूपच औचित्यपूर्ण आहे. कारण बाबासाहेब हे अफाट कर्तृत्वाने भरलेलं नाव, सबंध जग व्यापूनही उरलेलं आहे. म्हणूनच
‘रेखला प्रकाश
माझीया ललाटी
उघडली ताटी
अंधाराची’ या शब्दांत कवी सुखदेव ढाणके बाबासाहेबांनी दिलेल्या प्रकाश-ऊर्जेला सलाम करतात.
या संग्रहाला प्रस्तावना देणाऱ्या प्रज्ञा दया पवार या आपल्या चिंतनपर कवितेत बाबासाहेबांना समष्टीच्या करोडो हातांनी अभिवादन करतात. बाबासाहेबांचं दुःखमुक्तीचं, जाती अंताचं ऊर्जस्वल तत्त्वज्ञान हे परिवर्तनवादी लेखकांचं प्रेरणास्थान आहे. म्हणूनच त्यांच्यावर अगणित कविता-लेख लिहिले गेले आहेत. युवराज सोनटक्के बाबासाहेब नावाच्या बलदंड ऊर्जानायकाला कष्टकरी आवाजाच्या प्रचंड ज्वालामुखीचा आवाज म्हणतात. तर कवी महेंद्र भवरे म्हणतात -
‘अक्षरशत्रूच्या काळजावरही कोरले तुम्ही त्वेषाचे
अक्षरलेणे अन् हृदयाच्या कप्प्याकप्प्यात
विचारांचे शिल्प ज्यावर मिरवतो आम्ही
अभिमानाची झालर
हे सारं काही रास्तच म्हणायचं!’
एखाद्या महापुरुषाचं, प्रज्ञासूर्याचं असणं कवीला नाडीच्या ठोक्यासारखं वाटावं हे केवढं भूषण आहे? कवी उत्तम अंभोरेंच्या या भावनेशी कुणालाच दुमत नोंदवता येणार नाही. अंधारालाच प्रकाशाच्या गर्भात फेकण्याची क्षमता असणाऱ्या ऊर्जेचं नाव बाबासाहेब असतं! बाबासाहेब ही अक्षय ऊर्जा आहे.
दिवसेंदिवस निर्माण होणाऱ्या सकस आंबेडकरवादी साहित्यामुळे मराठी साहित्याचे दालन समृद्ध होत आहे. दामोदर मोरे आपली वेगळी अनुभूती नोंदवताना म्हणतात -
‘… आणि
शब्द चांदणं होऊन बरसायला लागतात
शब्द सुगंध होऊन दरवळायला लागतात
शब्द मधाचे थेंब होऊन ठिबकायला लागतात
शब्द अंगार बनून शिलगायला लागतात’
अभिवादनाच्या या सर्जन पर्वात कुठलाच कवी मागे राहू इच्छित नाही. डब्ल्यू. कपूर, लोकनाथ यशवंत, प्रतापसिंग बोदडे, नंद तायवाडे, अजय कांडर, पी. विठ्ठल, वीरा राठोड, दुर्गेश सोनार इ. सर्वांच्याच प्रतिभेला बहर आल्याचे जाणवते. कांडर माणसावर माणसासारखंच प्रेम करायचा संदेश देतात. गिमेकर विशेष कवितेला ‘मिलिंद विद्यापीठ’ असं सूचक शीर्षक देतात. अशोक थोरात प्रश्न उभे करत म्हणतात -
‘क्रांतीचा सागर कैसा लागला आटू?
बाबा, तुमचे पुतळे आता लागले बाटू!’
या पुस्तकातील कविता म्हणजे, केतन पिंपळापुरे म्हणतात त्याप्रमाणे; ‘प्रज्ञेचं एव्हरेस्ट’ बाबासाहेब नावाच्या युगप्रवर्तक विचारांना अभिवादन करणाऱ्या डोळस काव्य शलाका आहेत! ते एकशे पंचवीस प्रखर प्रतिभांनी प्रज्ञापुत्र बाबासाहेबांच्या अग्निधर्मी व्यक्तित्वावर नोंदवलेले भाष्य आहे.’ ज्या वेळी बाबासाहेबांच्या डोळ्यांतल्या तेजाशी कवींची नजर भिडते, तेव्हा दिव्यत्वाची अनुभूती देणाऱ्या तेजस्वी काव्य शलाका जन्माला येतात! गंगाधर अहिरे, सुरेश साबळे, संजीवकुमार सोनवणे, अशोक इंगळे, सुदाम सोनुले, सागर जाधव, दीपध्वज कोसोदे, दीपक ढोले, मुकुंद राजपंखे, मच्छिंद्र चोरमारे, आनंद गायकवाड, संजय घाडगे, दीपकराज कापडे, संजय घरडे या सगळ्यांच्या रचनाही लक्षणीय आहेत.
नामदेव पळतेकरांना बाबासाहेब नावाचा वादळणारा विचार ‘सतेज संवादाचा उग्र उच्चार’ वाटतो. मंगेश बनसोडांना भूतलावरचा चमत्कार वाटतो. सुनील अवचार सामान्यांना मुठी आवळायचा सल्ला देतात. राजेंद्र गोणारकर म्हणतात - ‘बाबासाहेब, नवं आभाळ बोलवत आहे. सर्वांनाच खुणावत आहे.’ यावरून असं लक्षात येतं की, हे कवी बाबासाहेबांना अभिवादन करताना समाजाला जागृत करतात.
मार्गदाता बाबासाहेब, दुःख मुक्तीचा मंत्र सांगणारे बाबासाहेब, देशाला घटनेची अनुपम भेट देणारे बाबासाहेब, अज्ञानाला शिक्षणाचा मंत्र देऊन सुरुंग लावणारे बाबासाहेब, द्रष्टे बाबासाहेब, दीन-दलितांना मान ताठ ठेवण्यासाठी अस्मिता बहाल करणारे बाबासाहेब! त्यांच्या किती-किती पैलूचं स्मरण करावं? या पुस्तकातील काव्यप्रतिभांनी बाबासाहेबांच्या सर्वच पैलूंना स्पर्श केलेला आहे.
माणूस हाच साहित्याचा आद्य, मध्य आणि अंतिम बिंदू आहे, हा मूल्यधर्मी विचार या कविता अधोरेखित करतात. उषा अंभोरे, सुरेखा भगत, संध्या रंगारी इ. वीस कवयित्रींच्या कविता या ग्रंथात आहेत. त्यामुळेही या कृतीला मोलाचं परिमाण प्राप्त झालं आहे. बाबासाहेबांसह काही महापुरुषांना सामाजिक परिवर्तनाचं स्वप्न पडलं होतं. ते पूर्ण झालेलं नाही. काही कवींनी नवजीवनवादी चळवळीकडे लक्ष वेधलं आहे. ही बाब खूप महत्त्वाची वाटते. या संग्रहातल्या सर्वच कविता पठनीय, वा संग्राह्य आहेत. कविता मानवतेची मातृभाषा असते याचं प्रत्यंतर आणून देणाऱ्या आहेत. यामागे संपादक द्वयांनी घेतलेले परिश्रम आहेत. त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन करणाऱ्या व मूल्यविवेक जागवणाऱ्या कवितांची निवड केली आहे. बाबासाहेब युगनायक होते. युगनिर्माते होते. हिंदीचे विख्यात कवी लिलाधर जगूडी असं म्हणतात की - ‘प्रत्येक युगात कविताच आपला धर्म सर्वात अगोदर ओळखत असते!’ बाबासाहेबांवर लिहिल्यानंतरही लेखकांना ऊर्जाच मिळते.
संपादक तथा कवी आत्माराम गोडबोले भीमपहाट कवितेत म्हणतात -
‘सरले रे भोग भीमा, ती सुटली रे वाट
गेली काळी रात्र, आज फुटली रे पहाट’
बाबासाहेबांमुळे दलितांच्या काळोखातील जीवनाला लख्ख तेजाचे परिमाण प्राप्त झाले.
मृत मनाला अस्मितेची झळाळी प्राप्त झाली!
‘ब्लू प्रिंट’ आणि ‘काषाय अक्षरे’सारखे चर्चित कवितासंग्रह मराठी साहित्याला देणारे वैभव सोनारकर हेही या काव्यग्रंथाचे संपादक आहेत. त्यांच्या -
‘कळू दे मला सिद्धार्था / दुःखाचा अर्थ नवा
मांडतो मी सुखाशी / आता उभा दावा’
या आशयघन ओळी रसिकांना आठवतात. ते ‘शब्दांच्या उजेडात’ आपल्या अंतःकरणातली कृतज्ञता ओतून म्हणतात -
‘तुझ्या शब्दांच्या उजेडात चालताना
काळोखी वाट काळोखी वाटत नाही!’
अर्थात भेसूरतेला निर्भयतेत बदलण्याची किमया त्या युगनायकाचीच!
दि इन्फिनिट बाबासाहेब
संपादन : आत्माराम गोडबोले, वैभव सोनारकर
प्रकाशक : डिंपल पब्लिकेशन, वसई
पृष्ठं : २८०
किंमत : ३०० रु.